१०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा..
एस.एस. सी. बोर्ड
राज्यातील शाळा अद्यापही बंदच आहेत. अशा परिस्थिती दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीयेत. शाळा बंद असल्या तरी या काळात शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, बोर्डाच्या दहावी (SSC exams) आणि बारावीच्या परीक्षा (HSC exams) कधी होणार? असा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे. यावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणू आहे, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती पाहू आणि त्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार करु. सीबीएसईने जसं परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. तशाच प्रकारे आम्ही सुद्धा १५ एप्रिलनंतर १२वी बोर्डाची परीक्षा घेण्याचा आणि १ मे नंतर दहावी बोर्डाची परीक्षा घेण्याच्या संदर्भात विचार करत आहोत”.
सी.बी.एस.ई . बोर्ड
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत आणि १० जून पर्यंत संपणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यानी कोणत्याही ताणतणावाशिवाय पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्याव्यात, असं आवाहन पोखरियाल यांनी केले आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पण त्या मार्च-एप्रिल महिन्यातही होऊ नयेत, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करत बोर्डाने थेट मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचा निकाल वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले. १५ जुलै पर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.