एका कलावंताचा प्रवास © मुकुंद कुलकर्णी
भगवान रामपुरे आणि जयंत पवार यांची ओळख सोलापुरातील प्रसिद्ध सिने कलावंत अतुल कुलकर्णी यांच्यामार्फत झाली . अतुल कुलकर्णी , जयंत पवार , भगवान रामपुरे या तिन्ही दिग्गजांची भेट हा अपूर्व योगायोगच . मुंबईतील एका प्रायोगिक नाट्य महोत्सवात यांची ओळख झाली सूर जुळले . तिघेही आपापल्या क्षेत्रात उच्च स्थानावर , तिघेही समर्थ कलाकार त्यामुळे तिघांची वेव्हलेंग्थ जुळली , मैत्री प्रस्थापित होणे स्वाभाविकच . या सगळ्या गोष्टी भगवानरावांच्या लिखाणातून उलगडत जातात , भगवानरावांच्या लिखाणातला स्वाभाविक पणा वाखाणण्यासारखा आहे .
सोलापुरात भरलेल्या साहित्य संमेलनातील दुसरी भेट दोघांच्याही दृष्टीने संस्मरणीय असणार . भगवानरावांच्या स्टुडिओला जयंत पवार यांची भेट , त्या भेटीत जयंतराव भारावून गेले हे स्वाभाविकच . भगवान रावांच्या स्टुडिओत फेरफटका मारला की असं होतच ! गेल्या महिन्यात त्यांच्या स्टुडिओत त्यांच्या भेटीचा योग आला तेव्हा मीही हा अनुभव घेतला आहे . क्रिएटिविटी वर या दोन महारथींची चर्चा ऐकण्याचा योग कुणाला आला असेल तो भाग्यवानच ! भगवान रावांचा निराकार बुद्धा हा शिल्पकलेचा फॉर्म आहे तो कुणालाही अस्वस्थ करणारा अंतर्मुख करणारा आहेच , तसा तो संवेदनशील जयंत पवार यांना अस्वस्थ करता झाला यात नवल ते काय ? भगवान रावांनी भेट दिलेल्या निराकार बुद्धाची छोटीशी प्रतिकृती जयंतरावांच्या सोबत होतीच . तो निराकार बुद्धा काही जयंत पवार यांना स्वस्थ बसू देईना . आणि त्यांनी भगवान रावांची महाराष्ट्र टाइम्स साठी फोन वर मुलाखत घेतली , जी दोन तासांपेक्षा जास्त वेळ रंगली . सदर मुलाखतीचा लेख भगवान रावांच्या वॉलवर वाचनात आला वाचताना जाणवलेल्या काही गोष्टी …..
मुख्यत्वे भगवानरावांच्या शिल्पकलेतून जाणवलेला अध्यात्मिक टच् हा या लेखनाचा गाभा आहे . स्टॉक एक्सचेंज च्या प्रवेशद्वारावरील बिग बुल , अॅबस्ट्रॅक्ट गणपती , बुद्ध मूर्ती चे विविध फॉर्म्स यांचा संदर्भ या लेखात अपरिहार्यच होता . रसिकांच्या दृष्टीने असलेले हे प्रयोग ही शिल्पकाराच्या दृष्टीने साधना आहे हा जयंतरावांच्या उल्लेख लेखाचे मर्म सांगून जातो !
खरं तर तरुण वयात भगवानराव नास्तिक . पूजा पाठ कर्म धर्म न मानणारे . गोरेगावात भाड्याने घेतलेल्या स्टुडिओत कामाचा श्रीगणेशा करण्याआधी पूजा करावी असा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे पूजा करण्याचे ठरले . भगवानरावांच्या हातात मातीचा गोळा आला डोळे बंद करून त्याला दिलेल्या आकारात साक्षात गजानन साकारला हाच तो सुप्रसिद्ध ऍब्स्ट्रॅक्ट गणपती . हा तर गणपती बाप्पाचा वरदहस्तच ! तो साकारताना भगवान रावांची जी अवस्था होती तीच तर समाधी अवस्था ! नंतर त्यांना या मूर्तीचा मोल्ड घेऊन ठेवण्याची सुबुद्धी श्रीगणेशाने दिली आणि आपणा सर्वांना लाभ झाला तो ॲब्स्ट्रॅक्ट गणेशमूर्तीचा . फायबरमध्ये ही मंगलमूर्ती आणखीनच देखणी दिसायला लागली . आता घरोघरी , ऑफिस मध्ये ,कार मध्ये मोठ्या मानाने विराजमान आहे हा ‘ अमूर्ताकार गणपती ‘ . या गणपतीच्या आशीर्वादाने वर्षाच्या आतच भगवानराव भाड्याच्या स्टुडिओतून स्वतःच्या मालकीच्या स्टुडिओत आले . भगवानरावांनी या गणेश मूर्तीचा धंदा केला नाही पण यावर दुसरे करोडपती झाले .
सोलापूरात विमानतळा जवळच भगवानरावांचा बंगला , त्यांचा स्टुडिओ , त्यातील विस्तीर्ण पसरलेला वटवृक्ष , त्याखाली अनंत कोटी ब्रम्हांडनायक योगीराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची प्रसन्न योगमुद्रा याचे पवारांनी केलेले वर्णन मनोहारी आहे ते आपल्याला प्रत्यक्ष स्टुडिओतच घेऊन जाते . शहराच्या कलकलाटापासून दूर असा हा भगवान रावांचा आश्रमच आहे . नीरव शांतता , पक्षांची किलबिल , झाडांच्या पानाची सळसळ यामुळे आपण खरोखरच एखाद्या ऋषींच्या आश्रमात आहोत असा भास होतो .
स्टॉक एक्सचेंजमधला बिग बुल , मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणातील बुद्धमूर्ती , अनेक इमारतींची शान भगवानरावंच्या शिल्पांनी वाढवली आहे . न्यूयॉर्कच्या बिग बुल ची भ्रष्ट नक्कल न करता शक्ती आणि उन्मादाचे मूर्तिमंत प्रतीक असलेला महाबैल आज शेअर बाजाराची शान वाढवतो आहे . आम्हा सोलापूरकरांच्या दृष्टीने तो एक मानबिंदू आहे . शिल्पकलेच्या प्रांतात भगवानरावांच्या सुरुवातीच्या प्रवासापासून झालेली स्थित्यंतरे त्यांचा आध्यात्मिक प्रवास सूचित करतात . भगवानरावांचे वडील स्वतः चांगले शिल्पकार , लहानपणापासूनच मातीत हात बरबटून नवनिर्मिती करण्याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते . शिल्पकलेची सुरुवात गणेशोत्सवा साठी निर्माण केलेल्या गणेश मूर्तीं पासून झाली . बघताबघता तो प्रवास निराकार बुद्धा पर्यंत पोहोचला . नेणिवेतून जाणीवेकडे चाललेला हा अध्यात्मिक प्रवास , हा समाधी अवस्थेकडे जाणारा , परमानंदा कडे जाणारा जर्नी ऑफ एक्स्टसी आहे !
बुवाबाजी , बाबा वगैरे गोष्टींवर भगवान रावांचा अजिबात विश्वास नव्हता . त्यांचे जवळचे आप्त आचार्य रजनीशांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाले होते . त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी रजनीशांचा अभ्यास सुरु केला . सुरुवातीला या भगवानाचा त्या भगवानांवर अजिबात विश्वास नव्हता ! सुरुवातीला रजनीशांबद्दल त्यांचे मत प्रतिकूलच होते . पण ते केवळ ऐकीव आणि सांगोवांगीच्या गोष्टींवर आधारित होते . ओशोंच्या कम्यूनमध्ये भगवानराव जाऊन आले , त्यांचे साहित्य वाचू लागले , त्यांच्या प्रवचनांच्या कॅसेटस् ऐकल्या आणि हळूहळू त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले . लहानपणापासूनच अध्यात्माकडे असलेला त्यांचा मूळचा कल अधिकच प्रबळ होऊ लागला . रजनीशांचं तत्वज्ञान , बुद्ध चरित्र , लीळा चरित्र , पाश्चात्त्य तत्ववेत्त्यांचं साहित्य यांचं वाचन मनन चिंतन यांचे संस्कार त्यांच्यावर घडत गेले . हे चिंतन , मनन , यामुळे हळूहळू भगवानरावांचं परिवर्तन एका तपस्वी कलाकारात होत गेलं . अक्कलकोटचे श्री समर्थ स्वामी महाराज यांचाही त्यांच्यावर पगडा आहे . स्वतः ला ते अक्कलकोट स्वामी महाराजांचे परमशिष्य मानतात . त्यांच्या स्टुडिओतील विशाल वटवृक्षाखाली अक्कलकोट स्वामी महाराजांची त्यांनी बनवलेली प्रतिमा जिवंत वाटते . अक्कलकोटचे स्वामी महाराज हे त्यांच्या मते त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाचे सद्गुरु आहेत . स्वामींवर त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे .

नकळत होणारी ध्यानधारणा , त्या अवस्थेत डोळ्यासमोर तरळणारे काही आकार , काही कल्पना त्यांना सुचत . अशीच त्यांना दिसलेली आणि सुचलेली एक तरल कल्पना म्हणजे मीरा . कृष्ण प्रीतीने उजळून गेलेली भगवान रावांच्या मनातली मीरा , ती साकार करण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास , त्यासाठी सुयोग्य मॉडेलचा शोध , मिरेची निर्मिती , हा सर्व प्रवास खास भगवान रावां कडूनच ऐकायला हवा . त्यांच्या अप्रतिम शिल्पांपैकी ते एक शिल्प .