लग्नयोग कसा- केव्हा ?
(मुलाचं अथवा मुलीचं लग्नाचं वय झालं की, लग्न कधी होणार, प्रेमविवाह की ठरवून, जोडीदार कसा असेल असे अनेक प्रश्न घरच्यांच्या आणि मुलामुलींच्याही मनात रुंजी घालायला लागतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी भविष्यात डोकावण्याचा मार्ग म्हणजे ज्योतिष. दिशादिग्दर्शन करणा–या या शास्त्राच्या दृष्टीकोनातून ‘लग्न’ या विषयाचा निरनिराळ्या निष्णात ज्योतिषतज्ञांनी घेतलेला वेध या अंकात देत आहोत.)
लग्न कुंडली आणि राशी कुंडली म्हणजे काय ?
हा बहुसंख्य लोकांना नेहमीच पडणारा प्रश्न. याविषयी अगदी ढोबळमनाने सांगायचे तर- राशीकुंडली ही व्यक्तीच्या जन्माचे वेळी जी रास असते त्या राशीची कुंडली असते. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती जन्मणा–या व्यक्तीची रास असते. कुंडलीतील प्रथम स्थानात ती रास अंकरुपाने मांडलेली असते व त्या राशीपासून पुढील अंक कुंडलीच्या द्वितीय, तृतीय याप्रमाणे पुढील स्थानात क्रमाने मांडलेले असतात. चंद्र सुमारे सव्वादोन दिवस एका राशीत असतो. जन्म झाल्यावेळी तो ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची जन्मरास वा चंद्ररास असते.
लग्नकुंडली म्हणजे व्यक्तीच्या जन्माचे वेळी पूर्व क्षितीजावर जी रास असते ती रास म्हणजे त्या व्यक्तीचे जन्मलग्न असते. लग्नकुंडलीचा आपण ज्याला ‘लग्न’ अथवा विवाह म्हणतो त्याच्याशी तसा काही संबंध नाही. मेष ते मीनपर्यंत बारा राशी पूर्वकडून पश्चिमेकडे ‘जायंट व्हिल’ प्रमाणे गोल फिरत असतात. प्रत्येक रास पूर्व क्षितिजावर सुमारे दोन तास असते. या दोन तासात जन्म झाला असता ती रास त्यावेळी जन्मणा–याचे लग्न असते. लग्नकुंडली मांडताना प्रथमस्थानात त्या राशीचा अंक मांडून पुढील स्थानात क्रमाने राशीचे अंक मांडलेले असतात. भविष्य वर्तविताना लग्नकुंडलीलाच जास्त महत्व असते. ज्यांना जन्मवेळ निश्चित माहीत नसते त्यांना राशी कुंडलीशिवाय पर्याय नसतो.
लग्नकुंडली व राशीकुंडली म्हणजे काय आहे हे आपण बघितले. आता सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विवाह या विषयाची आपण माहिती करुन घेऊयात.
विवाह केव्हा होईल ? जोडीदार कसा असेल ? दूरचा की जवळचा, वैवाहिक सौख्य लाभेल का ? असे अनेक प्रश्न मुला-मुलींच्या तसेच त्यांच्या पालकांच्या मनात सतत येत असतात.
सोबत दिलेल्या कुंडलीत दर्शविलेले सप्तमस्थान हे विवाहाच्या बाबतीतील महत्वाचे स्थान आहे.
काही महत्वाच्या गोष्टी –
- ‘लग्न’ या विषयावर विचार करताना मुलाच्या कुंडलीत चंद्र-शुक्र तर मुलीच्या कुंडलीत रवि-शुक्र हे महत्वाचे ग्रह असतात.
- शनि, मंगळ आणि राहू हे ग्रह विवाहाला विलंब करतात. विवाहसौख्यात बाधा आणतात.
- गुरु ग्रह नेहमीच शुभ असतो. कुंडलीतील त्याच्या स्थितीवर वैवाहिक सौख्य अवलंबून असते.
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसला तरी राशी आणि ग्रह यांची अगदी थोडीतरी माहिती असणे योग्य ठरते.
मेष ही मंगळाची, वृषभ ही शुक्राची, मिथुन ही बुधाची, कर्क ही चंद्राची, सिंह ही रविची, कन्या ही बुधाची, तूळ ही शुक्राची, वृश्चिक ही मंगळाची, धनु ही गुरुची, मकर आणि कुंभ शनिच्या आणि मीन ही गुरुची रास आहे.
- सप्तमस्थानात जी रास असते त्या राशीचा ग्रह हा वैवाहिक बाबतीत महत्वाचा ग्रह असते. उदा. सप्तम स्थानात कन्या रास असेल तर त्या राशीचा ग्रह बुध हा महत्वाचा ठरेल.
विवाहाला विलंब –
विवाहाला विलंब होण्यात शनि, मंगळ आणि राहू यांचा हात असतो. शनि प्रथमस्थानी, पंचमस्थानी, सप्तमस्थानी किंवा दशमस्थानी असता, मंगळ प्रथमस्थानी, चतुर्थस्थानी, सप्तमस्थानी, अष्टमस्थानी किंवा बाराव्या स्थानी असता, तसेच राहू प्रथमस्थानी किंवा सप्तमस्थानी असता विवाहाला विलंब होतो.
पत्रिकेत शनिदोष असता विवाह ३० वयानंतर होतो. मंगळदोष असता विवाह २८ वयानंतर होतो. राहूदोष असता ३२ ते ३५ वयापर्यंतही विवाह होत नाही.
असमाधानकारक विवाह –
- विवाहाला विलंब लावणा–या योगाबरोबरच सप्तमात असणा–या राशीचा ग्रह सहाव्या, आठव्या किंवा बराव्या स्थानी असता.
- सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानातील राशींचे ग्रह सप्तम स्थानात असता वा सप्तम स्थानाच्या राशीच्या ग्रहाबरोबर इतर कुठल्या स्थानात असता विवाह असमाधानकारक ठरतो.
- पुरुषाच्या कुंडलीत चंद्र, शुक्र हे मंगळ, शनि किंवा राहुबरोबर असता मनाप्रमाणे विवाहसौख्य मिळत नाही.
- स्त्रीच्या कुंडलीत रवि, शुक्र हे मंगळ, शनि किंवा राहूबरोबर असता मनाप्रमाणे विवाहसौख्य मिळत नाही.
मंगळाची भूमिका –
वैवाहिक बाबतीत मंगळ हा ग्रह खलनायकाची भूमिका बजावत असतो. मंगळ हा ग्रह प्रथमस्थानी, चतुर्थस्थानी, सप्तमस्थानी, अष्टमस्थानी आणि बाराव्या स्थानी असता ‘मंगळाची कुंडली आहे’ असे समजले जाते. त्याचे हे वास्तव्य त्रासदायक असेच असते. त्यामुळेही विवाहाला उशीर होतो.
मंगळ पाहण्याची आवश्यकता नाही, त्याचा फार बाऊ करु नये असे जरी मानले तरी वरील स्थानी मंगळ असता त्याचा अनुभव त्रासदायक असाच येतो. विवाह २८ वयानंतर होतो. लग्नाला उशीर होणे, लग्नात अडचणी येणे, ठरलेला विवाह मोडणे.
प्रेमसंबंध फिसकटणे, लग्नानंतर मतभेद होणे, गृहसौख्यात कटकटी असे योग संभवतात. मंगळ पाहताना दुराग्रही भूमिका ठेवण्याची आवश्यकता नसली तरी त्याच्या फलिताची कल्पना अवश्य असावी.
सुखी विवाह –
चंद्र-गुरु, रवि-गुरु, सप्तमस्थानाचा ग्रह आणि गुरु यांचे शुभयोग असता विवाह योग्य यांचे शुभयोग असता विवाह योग्य वयात होतो. वैवाहिक जीवन सुखावह होते.
‘शुभयोग’ म्हणजे गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून मोजले असता त्याच्या पाचव्या स्थानी, सातव्या स्थानी किंवा नवव्या स्थानी रवि, चंद्र किंवा सातव्या स्थानाचा ग्रह असणे.
प्रेमविवाह –
प्रेमाचे माणूस मिळावे, प्रेमविवाह व्हावा ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण त्यासाठी जन्माचे वेळी तसे ग्रह घेऊन यावे लागते. यादृष्टीने पाहता पाचवे आणि सातवे स्थान महत्वाचे असते. पाचव्या स्थानाचा ग्रह सातव्या स्थानी असणे, सातव्या स्थानाचा ग्रह पाचव्या स्थानी असणे, किंवा या कोणत्याही स्थानी दोन्ही ग्रह एकत्र असणे, हे ग्रह शुक्र या ग्रहाबरोबर असणे, चंद्र-गुरु, रवि-गुरु यांचा शुभयोग असणे, असे ग्रहमान प्रेमविवाहाला व सुखी विवाहालाही पोषक असते.
विवाह केव्हा होईल ?
- पुरुषाच्या बाबतीत चंद्र-गुरु एकत्र असता तसेच चंद्र गुरुपासून पाच किंवा सातव्या स्थानात असता.
- स्त्रियांच्या बाबतीत रवि-गुरु एकत्र, रवि गुरुपासून पाचव्या किंवा सातव्या स्थानात असता होऊ शकतो. शनि, मंगळ, राहू यांच्यापैकी कशाचा दोष नसेल तर विवाहयोग लवकर म्हणजे योग्य वयात येतो.
- स्त्रीच्या कुंडलीत ज्यावेळी चलित गुरुचे भ्रमण तिच्या जन्मगुरुवरुन होते त्यावेळी ती समंजस होते. तसेच पुरुषाच्या कुंडलीत ज्यावेळी चलित गुरुचे भ्रमण त्याच्या जन्मराहूवरुन होते त्यावेळी हा योग येतो. लवकर किंवा उशीरा विवाह याची वयोमर्यादा देश, काल, जाती, समाजानुसार वेगवेगळी असू शकते. ती एकदा निश्चित झाल्यावर गोचर गुरुच्या भ्रमणावरुन त्याचा कालनिर्णय करता येतो.
गोचरीचा गुरु ज्यावर्षी प्रथम, तृतीय, सप्तम किंवा एकादशस्थानी येतो, त्यावर्षी विवाहयोग संभवतो. त्याचवेळी जर चंद्र, रवि, शुक्र वा सप्तमस्थानाच्या राशीचा ग्रह यांच्याशी गुरुचा शुभयोग होत असेल तर विवाह होण्याची दाट शक्यता असते.
लवकर विवाह –
स्त्री-पुरुषांच्या कुंडलीत रवि-गुरु असे एकत्र किंवा शुभयोगात असता, सप्तमस्थानचा ग्रह गुरुच्या बरोबर किंवा गुरुच्या शुभयोगात असता, सप्तमस्थानात चंद्र किंवा शुक्र असता, सप्तमस्थानावर गुरुची दृष्टी असता म्हणजेच जन्मकुंडलीत गुरु प्रथम, तृतीय किंवा अकराव्या स्थानी असला तरी विवाह लवकर होतो.
उशीरा विवाह –
सप्तमस्थानात रवि, शनि, मंगळ किंवा राहू असता विवाहाला विलंब होतो. तसेच स्त्रीच्या कुंडलीत रवि-शनि, रवि-मंगळ, रवि-राहू अशा जोड्या असता विवाहाला विलंब होतो. तर पुरुषाच्या कुंडलीत चंद्र-शनि, चंद्र-मंगळ, चंद्र-राहू अशा जोड्या असता विवाहाला विलंब होतो.
जोडीदार कोणत्या दिशेचा असेल –
बारा राशींना दिशा वाटून देण्यात आल्या आहेत.
पूर्व दिशा : मेष, सिंह धनु,
पश्चिम दिशा : मिथुन, तूळ, कुंभ
दक्षिण दिशा : वृषभ, कन्या, मकर
उत्तर दिशा : कर्क, वृश्चिक, मीन
सर्वसाधारण सप्तमस्थानाचा ग्रह ज्या राशीत असेल त्या दिशेचा जोडीदार मिळेल असे मानले जाते. आणखी एक पद्धत अशी आहे की, स्त्रीच्या बाबतीत सप्तमस्थानाचा ग्रह किंवा आणि पुरुषांच्या बाबतीत सप्तमस्थानाचा ग्रह किंवा चंद्र १२,१, २ या स्थानी असता पूर्व दिशा, ३,४,५ या स्थानी असता उत्तर दिशा, ६,७,८ या स्थानी असता पश्चिम दिशा आणि ९,१०,११ या स्थानी असता दक्षिण दिशेचा जोडीदार मिळेल असे मानले जाते.
जोडीदार जवळचा की दूरचा ?
स्त्रीची कुंडली असता सप्तमचा ग्रह आणि रवि, तर पुरुषांची कुंडली असता सप्तमाचा ग्रह आणि चंद्र पत्रिकेत कुठे आहेत हे बघता –
१,२,३, स्थानात असता अगदी जवळचा ४,५,६ स्थानात असता त्यापेक्षा थोडा दूरचा, ७,८,९ स्थानात असता ब–यापैकी दूरचा आणि १०,११,१२, या स्थानी असता फार दूरचा जोडीदार मिळतो.
जोडीदाराचे रंगरुप –
जोडीदार दिसायला कसा असेल हा तर प्रत्येकाच्याच मनातील सर्वात औत्सुक्याचा प्रश्न असतो. या करिता सप्तमस्थानातील राशी, सप्तमस्थानातील ग्रह यांचा विचार करावा लागतो. ग्रहांच्या स्वभावगुणधर्माप्रमाणे सहचराचे स्वभावगुण असतात आणि राशीप्रमाणे शरीरबांधा असतो.
सप्तमस्थानी ज्या ग्रहाची रास असते त्या ग्रहाच्या वर्णनाप्रमाणे जोडीदाराचे वर्णन असते. किंवा एखादा ग्रह जर त्या स्थानात असेल तर त्या ग्रहाप्रमाणे त्याचे वर्णन असते. याकरिता प्रत्येक ग्रहाचा बारकाईने अभ्यास असणे आवश्यक आहे.
थोडक्यात सांगायचे तर, सप्तमस्थानी मंगळाची रास वा मंगळ असता किंवा मंगळ असता भांडखोर, तापट, अरेरावी करणारा, वाद घालणारा, हट्टी, तामसी, विषयासक्त, वर्चस्व गाजवणारा, उच्छृंखल स्वभावाचा, तांबूल किंवा कृष्णवर्णी असा जोडीदार असतो.
सप्तमस्थानी शुक्राची रास किंवा शुक्र ग्रह असता देखणी, प्रेमळ, शौकिन, कलावान, आनंदी, समंजस, कदर करणारा, शांत स्वभावाचा, उत्तम व्यक्तिमत्वाचा, आधुनिकतेची आवड असणारा असा जोडीदार असतो. विवाहयोग लवकर येतो. राहू, मंगळ, किंवा हर्षल याच्या कुयोगात असता प्रेमभंग, विभक्तपणा असे प्रसंग येतात.
सप्तमस्थानी बुधाची रास किंवा बुध ग्रह असता चतुर, विश्र्वासू, हसतमुख, व्यवहारदक्ष, बोलका, बुद्धिमान, विनोदी स्वभावाचा, सतत हसत बोलणारा, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, प्रेम करणारा, हलका कानाचा, उंचीने मध्यम, गुणी असा जोडीदार असतो.
सप्तमस्थानी चंद्राची रास किंवा चंद्र असता चंचल स्वभावाचा, भावनावश, प्रेमळ, लहरी, कलावान, अनेक गोष्टींची आवड असलेला, सर्वांशी मिसळून राहणारा, समाजकार्याची आवड असणारा, संसारदक्ष, प्रसिद्ध प्रवासाची आवड, गौरवर्णी, छानछौकीने राहणारा, दिसण्यास आकर्षक असा असतो. विवाहयोग लवकर येतो.
सप्तमस्थानी रविची रास किंवा रवि ग्रह असता मानी, गर्विष्ठ, तडफदार, रुबाबदार, हुकमत गाजवणारा, स्वाभिमानी, दुस–याला मदत करणारा, अन्यायाची चीड असणारा, एकमेकांविषयी आकर्षण कमी असलेला, उच्च घराण्यातील असतो. विवाहयोग उशीरा येतो. शुभग्रहांची साथ असता विवाह सुखावह होतो.
सप्तमस्थानी गुरुची रास किंवा गुरु ग्रह असता विद्वान, प्रेमळ, हुशार, धार्मिक-सात्विक वृत्तीचा, ज्ञानी, ज्ञानदान करणारा, समाजकार्याची आवड असणारा, समंजस, शांत स्वभावाचा, व्यवहारी, आदरणीय व्यक्तिमत्वाचा असा असतो. स्वभावभिन्नतेमुळे आकर्षण कमी राहते. गुरुच्या दृष्टीत असता विवाह लवकर होतो. शनिच्या दृष्टीत असता विवाह उशीरा होतो.
सप्तमस्थानी शनिची रास किंवा शनि असता अत्यंत धूर्त, कावेबाज, विश्र्वासास अपात्र, कर्तव्यनिष्ठ, कष्टाळू, सोशिक स्वभावाचा, हवतेत मनोरे बांधणारा, हलक्या कानाचा, राजकारणाची आवड असणारा असा जोडीदार असतो. विवाह उशीरा होतो. विवाहसौख्य साधारण मिळते.
वर वर्णन केलेल्या स्वभावर्णनाचा अनुभव विशेषत: सप्तमस्थानी राशीपेक्षा ग्रह असता विशेष येतो.
शनि बिघडला असता विषयवासना कमी असलेला वा नपुसंक सहचर असतो.
घटस्फोट –
पूर्णपणे विस्कळीत झालेले विवाहजीवन म्हणजे घटस्फोट ! या बाबतीत महत्वाची भूमिका बजावणारा ग्रह म्हणजे हर्षल. सुरुवातीला उल्लेख केलेले काही कुयोग असून जर हर्षल हा ग्रह सप्तमस्थानी किंवा प्रथमस्थानी असेल, तसेच कुंडलीत कोणत्याही स्थानी चंद्र-हर्षल, रवि-हर्षल, एकत्र किंवा समोरासमोर असतील तर घटस्फोटाची दाट शक्यता असते. या योगामुळे विवाहाच्या बाबतीत नाटयपूर्ण घटना, मतभिन्नता, फसवणूक इत्यादी घटना संभवतात.
- होराभूषण शोभा प्रभू
Pc: google