साठये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ महोत्सव
साठये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते ’ महोत्सव
विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयात २२ फेब्रुवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विज्ञानाधिष्टीत वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल पार्लेकरांना अनुभवता येणार आहे.
विज्ञानविषयक चित्रपट, नाटके, एकांकिका, व्याख्याने, स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची लयलूट असलेला ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ महोत्सव फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी शनिवारी येथे दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते मंगळवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी होणार आहे. टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) तज्ज्ञांद्वारे घर नावाची प्रयोगशाळा या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही त्या दिवशी करण्यात आले असून सायंकाळी ‘डार्विन’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम पुढील आठवडाभर आयोजित करण्यात आले आहेत. हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. मात्र, कोविड निर्बंध लक्षात घेता आगाऊ नोंदणीनेच प्रवेश देण्यात येतील, असे डॉ. राजवाडे यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या वेबसाइटवर या कार्यक्रमाचे संपूर्ण आठवडाभराचे वेळापत्रक आणि त्यांतील प्रवेशासाठी नोंदणीची व्यवस्था आहे.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून देशभरात ७५ शहरांत एकाच वेळी ७५ विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनातून हा अमृतमहोत्सवी सोहळा रंगणार आहे. संरक्षण, अवकाश, आरोग्य, कृषी, खगोलशास्त्र आणि अन्य अंगांनी भारताची शास्त्रीय महत्ता व तांत्रिक क्षमता यांचे दर्शन देशवासियांना घडविण्याचा प्रयत्न या महोत्सवात केला जाणार असून आठवडाभरात व्याख्याने, चर्चासत्रे, चित्रपट, नाटक, पुस्तक प्रदर्शने, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा अशा ७५ वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विज्ञानप्रसाराला एकाच वेळी मोठी चालना देण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागारांचे कार्यालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांचाही मोलाचा सहभाग आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या विज्ञान प्रसार या स्वायत्त संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. विज्ञान प्रसारची सहयोगी संस्था म्हणून साठये महाविद्यालयाची या महोत्सवाच्या आयोजनाकरिता निवड झाली, असेही डॉ. राजवाडे म्हणाले.
या महोत्सवानिमित्त निबंध लेखनापासून प्रकल्प सादरीकरणापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या नऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांचे पारितोषिक वितरण महोत्सवाच्या समारोप समारंभात २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
खालील इमेज वर क्लीक करून आपल्याला या महोत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक पाहता येईल.

Vigyan sarvatra pujyate schedule – 28-28 February 2022
आगाऊ नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करून फॉर्म भरता येईल.
https://sathayecollege.edu.in/vsp/


